भंडारा जिल्ह्यातील बेला हे एक सामान्य गाव. पण या गावाने ‘जैसे थे’ परिस्थिती न स्वीकारता बदलाची कास धरली आणि या बदलाच्या केंद्रस्थानी आहेत सरपंच शारदा गायधने.
“वातावरण बदलाचे परिणाम हे केवळ मोठ्या आपत्तीमधूनच समजतात, असं नाही, तर आपण वापरत असलेलं पाणी, आपण पिकवलेलं अन्न आणि आपण घेत असलेल्या श्वासातूनही त्याचे परिणाम जाणवतात. या बदलाचा सर्वात पहिला परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आणि माझ्या गावाच्या हिताचं काम करणं ही माझी जबाबदारी आहे,” असे दोनदा निवडून आलेल्या सरपंच आणि वसुंधरा पुरस्कार विजेत्या शारदा गायधने म्हणतात.
त्यांच्या नेतृत्वाखाली वातावरण बदलाबद्दल जागरूकता हा दैनंदिन आयुष्याचा भाग झाला आहे. गावातील कुटुंबांनी लग्नसमारंभ आणि सणांच्या निमित्ताने ९०,०००हून अधिक झाडं लावली. धूर करणाऱ्या पारंपरिक चुलींऐवजी स्वयंपाकघरांमध्ये एलपीजीचा वापर सुरू झाला. सौरऊर्जेने घरे, अंगणवाड्या आणि पंचायत कार्यालये प्रकाशमान केली. प्रत्येक घराला कचऱ्याचं वर्गीकरण करण्याची सवय लागली आणि एकदाच वापरल्या जाणारं प्लास्टिक नाकारणं हळूहळू सर्वांच्या अंगवळणी पडलं.
रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट (RSCD) यांनी या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या ‘सावित्री अकॅडमी’च्या माध्यमातून क्षमता वाढ आणि नेतृत्व प्रशिक्षणाला भक्कम पाठबळ मिळालं. सामुदाय पातळीवर भरघोस सहभाग आणि सक्रिय ‘कार्बन न्यूट्रल कमिटी’च्या पुढाकारामुळे बेला हे महाराष्ट्रातील पहिलं नेट-झीरो गाव ठरलं आणि २०२४ चा राष्ट्रीय पंचायत पुरस्कारही प्राप्त केला.
भंडाऱ्यातील बेला या छोट्याशा गावनं संवेदनशीलता, धाडस आणि एकीच्या बळावर वातावरण बदलासंदर्भातील कृतीची ‘ब्लू प्रिंट’ तयार केली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.