वातावरणबदलाबद्दल चर्चा करण्यासाठी आम्ही वारली चित्रकलेची निवड का केली?
गेली अनेक वर्षे वातावरण बदल आणि त्याच्या परिणामांची चर्चा ही बहुदा तज्ज्ञ, संशोधक आणि धोरणकर्त्यांपर्यंतच मर्यादित राहिली आहे. आता मात्र अशी वेळ येऊन ठेपली आहे, जेव्हा केवळ संज्ञा आणि तांत्रिक शब्दांमध्ये होणाऱ्या चर्चेपर्यंत हा विषय मर्यादीत राहून चालणार नाही. कारण अशी चर्चा किंवा वादांमुळे तात्पुरती खळबळ उडते. पण सामान्यांपर्यंत या समस्येचे महत्त्व ज्या तीव्रतेने पोहोचले पाहिजे, त्या तीव्रतेने पोहोचत नाही. वातावरण बदलाच्या या आव्हानावर उपाययोजना करण्यासाठी प्रथम ही समस्या सगळ्यांना समजेल अशा भाषेत मांडणे गरजेचे आहे, असे ‘असर’मध्ये आम्हाला वाटते.
यासाठी दिनेश बरप आणि आकाश भोईर या दोन तरुण आदिवासी वारली चित्रकारांशी आम्ही संपर्क साधला. या दोघांनी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात हे आगळेवेगळे चित्र साकारले आहे. ‘मुंबई क्लायमेट वीक’च्या निमित्ताने ही कलाकृती साकारली आहे. या उपक्रमामुळे वातावरण बदलाचे परिणाम आणि त्यावरील उपायांची चर्चा तज्ज्ञ आणि संस्थात्मक वर्तुळाच्या बाहेर पोहचेल. सार्वजनिक पातळीवर, सामान्य लोकांमध्ये या विषयी बोलले जाईल. प्राणीसंग्रहालयाला भेट देणाऱ्या सर्व स्तरातील कुटुंबांमध्ये आबालवृद्धापर्यंत हा विषय थेट पोहचू शकेल.
दोन वाटा एक वर्तुळ: वातावरण बदल, समुदाय आणि आपण काय निवडतो, याची वारली शैलीतील मांडणी
या वारली चित्रकलेत दोन भाग दाखवले आहेत. वाढते तापमान, अनियमित पाऊस, हवेची व पाण्याची खालावलेली गुणवत्ता आणि समुद्राची वाढती पातळी व किनारपट्टीवर येणारे पूर, दुष्काळ व बदलेल्या ऋतूचक्राचा शेतीवर होणारा दुष्परिणाम इत्यादी परिणाम एका बाजूला दाखवले आहेत. या समस्या आपल्यापासून फार लांब नसून त्या आज थेट आपल्या दारापर्यंत पोहचल्या आहेत. या समस्यांचा शेतकऱ्यांवर, मच्छिमारांवर, गावांपासून ते महानगरापर्यंत सर्व स्तरातील नागरिकांवर, मुलांवर आणि वन्यजीवनावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होत आहे.
या आव्हानाला आपण एकत्रितपणे कसे सामोरे जाऊ शकतो ते चित्राच्या दुसऱ्या बाजूला दाखवले आहे. पर्यावरणाला किमान हानी पोहोचविणाऱ्या ऊर्जेचा म्हणजे क्लीन एनर्जीचा वापर करणे, परिसंस्थांचे पुनःस्थापन करणे, शाश्वत परिवहन सेवांचा वापर आणि सार्वजनिक ठिकाणे जबाबदारीने जपणे, वातावरण बदलाला तोंड देण्यास सक्षम असलेल्या शेतीला पाठिंबा देणे आणि उत्सर्जन कमी करणे अशा सर्वांनीच अंमलात आणायच्या उपाययोजनांचा त्यात समावेश होतो. या चित्रांवरून आपल्याला जाणवते की, वातावरण बदलावर उपाययोजना करण्यासाठी एकत्रितपणे कृती करणे आवश्यक आहे. या कृती लोककेंद्री असतील, दूरदृष्टीने घेतलेल्या शासकिय निर्णयाचे त्यास पाठबळ असेल आणि शाश्वत भविष्याच्या दृष्टीने काम करणाऱ्या उद्योग व्यवसायांचा त्यात समावेश असेल हे गरजेचे आहे.
या म्युरलच्या परीघावर हातात हात गुंफून पारंपरिक वारली नृत्य करणारी माणसे चितारली आहेत. वातावरण बदलावरील कृती ही कायम मानवकेंद्री असते आणि वातारणीय बदलांच्या परिघाबाहेर कोणीही जाऊ शकत नाही. वातावरण बदल ही सामुदायिक समस्या आहे आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांचीच आवश्यकता आहे. समुदायांना या समस्येची, किंबहुना धोक्याची जाणीव असणे, त्यावर कृती करण्यासाठी लोकांना आवाहन करणे, सरकारचा त्याला पाठिंबा असणे आणि उद्योग व्यवसायांनी या उपाययोजनांमध्ये गुंतवणूक करणे याचा त्यात समावेश आहे. समुदायांपासून नेतृत्वाने एकत्रितपणे कृती करण्याचे ठरविले तर ज्या हातांनी परिस्थिती बिघडवली आहे, तेच हात त्यावर उपायही करू शकतात.
किमान अभिव्यक्तीतून कमाल परिणाम साधाणाऱ्या या वारली कलेच्या माध्यमातून वातावरण बदलासारखी गुंतागुंतीची समस्या मानवी कथांच्या रूपात सोपी करुन सांगण्यात आली आहे, जेणेकरून सगळ्यांना या समस्येचे गांभीर्य समजू शकेल. या भित्तीचित्राच्या निमित्ताने विशेषतः मुलांना आणि तरुणांना आवाहन करण्यात आले आहे. मुंबई व महाराष्ट्राला वातावरण बदलाच्या समस्येला तोंड देण्यासाठी कसे सक्षम करता येईल, यावर त्यांनी व्यक्त व्हावे अशी यामागची अपेक्षा आहे.
वातावरणाच्या भविष्याबद्दल चर्चा करण्यासाठी देशविदेशातील तज्ज्ञ, संस्था, शासन, प्रशासन ‘मुंबई क्लायमेट वीक’मध्ये एकत्र येत असताना या चित्राच्या माध्यमातून सर्व वयोगटातील, परिसरातील आणि वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्यांशी थेट संवाद साधण्यात आला आहे. वातावरण बदलामुळे मानवजातीवर, आयुष्यावर, त्यांच्या निवडींवर आणि जबाबदाऱ्यांवर कशा प्रकारे परिणाम होत आहे, हे पाहण्यासाठी सर्वांना एक प्रकारे आवाहन करण्यात आले आहे.
चित्रकारांची माहिती :
दिनेश बरप हे मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नवा पाडा येथील वारली चित्रकार आहेत. दिनेश यांनी या कलेचा वारसा त्यांना त्यांच्या आजीकडून मिळाला आहे. मुंबईतील रुईया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेतील पदवी प्राप्त केली आहे. दिनेश यांनी २०२१ मध्ये लिव्हिंग वॉटर्स म्युझियमसाठी झालेल्या कॉन्फ्लुअन्स एक्झिबिशनमध्ये तसेच २०२४ मध्ये केआरव्हीआयएसाठी आयोजित फॉरेस्ट इन द सिटी या प्रदर्शनात आपली कला सादर केली होती. ही प्रदर्शने सीएसएमव्हीएस आणि गोदरेज कॅम्पस, विक्रोळी येथील कॉन्शस कलेक्टिव्ह येथे आयोजित करण्यात आली होती. ते जंगलभ्रमंती उपक्रम आणि वारली कार्यशाळांचे आयोजन करतात. सध्या ते मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ फाइन आर्ट्स येथे फाइन आर्ट्सचे शिक्षण घेत आहेत.
आकाश भोईर हे मल्हार कोळी जमातीतील समकालीन वारली कलाकार आहेत. ते आपल्या कुटुंबासह आरे कॉलनीतील केलटीपाडा या आदिवासी पाड्यातील त्यांच्या वडिलोपार्जित घरात राहतात. आपल्या समुदायाची सांस्कृतिक परंपरा जिवंत ठेवण्यासाठी आकाश सातत्याने काम करत आहेत. निसर्गाशी आणि आदिवासी ज्ञानाशी पुन्हा नाते जोडता यावे, यासाठी त्यांनी कलेच्या माध्यमातून विविध कलाकृती आणि ठिकाणांची मांडणी केली आहे. त्यांच्या दृष्टीने वारली कला ही केवळ सजावटीची शैली नसून ती एक ‘हरवलेली लिपी’ आहे, जी त्यांच्या समाजाच्या आठवणी आणि अनुभव जपून ठेवते. वारली कलेचा आत्मा जपताना ती पुढे विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, जेणेकरून त्यांच्या समाजाच्या कथा, संघर्ष आणि जगणे जागतिक स्तरावर पोहोचू शकेल.
You can also read this blog in English by clicking here.